अमरावती - राज्य राखीव पोलीस दलाचे सहा जवान कोरोनावर मात करून मालेगाव येथून अमरावतीत परतले. या सहाही जवानांवर पुष्प वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. पुढील 7 दिवस या जवानांना विलगिकरण कक्षात ठेवले जाणार आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाचे 400 जवान मुंबई, धुळे आणि मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. यापैकी मुंबई आणि धुळे येथे प्रत्येकी 100 जवान तर मालेगावला 200 जवान तैनात होते. मालेगाव येथे बंदोबस्तावर असणाऱ्या 12 जणांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना नाशिकच्या कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अमरावतीत परतलेल्या जवानांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, नाशिक येथील कोविड रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेले 6 जवान अमरावतीत परतले. राज्य राखीव पोलीस दलाचे अमरावती सामदेशक लोहित मतानी यांनी या सहाही जवानांचे पुष्प देऊन स्वागत केले. इतर सहकारी जवानांनी त्यांच्यावर पुष्प वर्षाव केला. राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात असणाऱ्या शाळेत आता हे सहा जण 7 दिवसांपर्यंत इतरांपासून वेगळे राहणार आहेत.