अमरावती - लॉकडाऊन दोन दिवसात न हटवल्यास रस्त्यावर उतरणार, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावले. मात्र, अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊनला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विरोध करत येत्या दोन दिवसात लॉकडाऊन न हटवल्यास मी स्वतः रस्त्यावर उतरणार, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - राणा दाम्पत्याच्या फोटोला शिवसैनिकांनी घातला चपलांचा हार
ठाकूर यांच्यावरही टीका
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरसुद्धा त्यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांन सोबत झालेल्या VCवेळी यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होती, जिथे गरज नव्हती तिथे लॉकडाऊन केला हे चुकीचे असून माझा या लॉकडाऊनला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. तर या लॉकडाऊनमध्ये व्यापारी, कामगार यांचे नुकसान आहे, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बघा खासदार नवनीत राणा यांची खास मुलाखत
'लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध'
सोमवारपासून लॉकडाऊन करण्यात आला असून कोरोनाची लाट थोपवण्यासाठी हे टाळेबंदी किंवा कडक निर्बंधांचे पाऊल उचलण्यात आले आहे. ते कुणा व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे, त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.