अमरावती - भाऊबंदकीच्या वादातून पुतण्याने चुलत्याच्या शेतात तणनाशक फवारणी करुन सोयाबीन पिक नष्ट केले. ही धक्कादायक घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथे घडली आहे. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी साहेबराव प्रल्हादराव नेरकर यांना वडिलोपार्जित शेतीतील दोन एकर शेती मिळालेली आहे. त्यामध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी केलेल्या दोन एकर क्षेत्रापैकी एक एकर शेतीमध्ये आरोपी अंकुश बाबाराव नेरकर याने तणनाशकाची औषधाची फवारणी केली. त्यामुळे एक एकर क्षेत्रातील खुरपणीला आलेले सोयाबीनचे पीक जळाले.
फिर्यादी साहेबराव नेरकर यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत साहेबराव नेरकर यांनी चांदूर रेल्वे पोलिसात आपल्या पुतण्याविरोधात तक्रार दाखल दिली आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी अंकुश नेरकर विरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.