अमरावती - तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये चक्क अमरावती जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याची जमीन चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हक्काची जमीन परत मिळावी यासाठी सिताराम कंटाळे या वृद्ध शेतकऱ्याने मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीत शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. न्याय न मिळाल्याने आज या वृद्ध शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून थेट जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर इच्छा मरणाची इच्छा व्यक्त करून त्यासाठी परवानगी मागितली आहे.
हेही वाचा - महा'अर्थ' संकल्प : जलसंधारणासाठी 'मुख्यमंत्री जलसंधारण योजना'
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोना रामनाथ या गावामध्ये सीताराम कंटाळे हे ६५ वर्षीय वृद्ध शेतकरी राहतात. त्यांच्याकडे एकूण तीन एकर ओलिताची शेती होती. त्यापैकी समृद्धी महामार्गात एका शेतातील ४१ गुंठ्यांपैकी २४ गुंठे शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या शेतातील ४३ गुंठे जमीन अधिग्रहण केली होती. दरम्यान, दोन्ही शेत अधिग्रहित झाल्यानंतर कंटाळे यांच्याकडे ५१ गुंठे जमीन शिल्लक राहणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडे फक्त २५ गुंठे जमीन शिल्लक राहिली आहे.
समृद्धी महामार्गाने २६ गुंठे जमीन चोरल्याचे धक्कादायक आरोप या वृद्ध शेतकऱ्यांने केला आहे. कंटाळे यांच्याकडे दोन विहिरी होत्या त्यासुद्धा समृद्धी महामार्गाच्या बांधकामात बुजवल्या गेल्या परंतू त्याचा ही मोबदला मिळाला नाही. तसेच गेलेल्या जमीनचा मोबदला ही बाकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मागील एक वर्षापासून न्याय न मिळाल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
हेही वाचा - महा 'अर्थ' : कृषी पंपांच्या नवीन वीज जोडणीला मिळणार मंजुरी