अमरावती - जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून सत्तारूढ महाविकास आघाडीने अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. परंतु काही भागात महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. एकूण जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल संमिश्र लागला आहे.
यशोमती ठाकुरांचे वर्चस्व; तर बच्चू कडूंना फटका -
जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी या गावात पालकमंत्र्यांच्या वर्चस्वाखालील गटाने बाजी मारली आहे. असे असताना तिवसा तालुक्यात मात्र अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने मुसंडी घेतली आहे. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांना त्यांच्या अचलपूर मतदार संघात फटका बसला आहे. अचलपूर आणि चंदूरबाजार दोन्ही तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली आहे. बच्चू कडू यांचा तालुका असणाऱ्या चांदूरबाजारमधील 41 पैकी 32 जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मोर्शीतही माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या गटाने तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मोर्शी तालुक्यात डॉ. अनिल बोंडे गटाला एकहाती सत्ता मिळाली आहे.
राणा दाम्पत्याला धक्का -
बडनेरा मतदार संघात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. याठिकाणी शिवसेनेने मुसंडी मारली. बडनेरा मतदार येणाऱ्या भातकुली तालुक्यातील 16 पैकी 12 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने बाजी मारली. तर दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गटाने बाजी मारली असून दर्यापूरात महाविकास आघाडीने अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. तसेच अमरावती तालुक्यात संमिश्र निकाल पाहायला मिळत आहे. अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे.
जो आला त्याला टिळा -
जिल्ह्यातील एकूण 537 ग्रामपंचायत निवडणुकीचे वास्तविक चित्र स्पष्ट करायचे, तर जो निवडून आला तो आपलाच, अशी भूमिका अनेक ठिकाणी सर्वच पक्षांनी घेतली आहे.