अमरावती - अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र, नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे एस टी बसेसमध्ये ‘नो मास्क, नो तिकीट’ पद्धती राबवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना दिले आहेत.
वाहक-चालकांनी लक्ष द्यावे -
बसस्थानकावर गर्दी होत असल्याच्या व प्रवासी मास्क वापरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत जिल्हाधिका-यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्याशी चर्चा केली. मास्क नसलेल्या प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नका. आवश्यक तिथे मार्शलची मदत घ्या. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बसस्थानकासारख्या ठिकाणी तर अधिक काटेकोरपणे कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वत: लक्ष घालून वाहक-चालकांनी प्रवाशांना नियम पाळण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
प्रशासन पुन्हा सज्ज -
कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने तालुकानिहाय कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती शहरात मनपा शाळा क्रमांक 17 विलासनगर, मनपा शाळा नागपुरी गेट, बडनेरा पोलीस ठाण्यामागील मनपा शाळा व विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात चाचणी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. तसेच, कोविड उपचारासाठी दोन नवीन रुग्णालये वाढवण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे.
खासगी निदान केंद्रातील अँटिजेन चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. नियमभंग करणा-यांविरुद्ध महानगरपालिकेकडून व जिल्ह्यात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही सातत्यपूर्ण मोहिम राबवण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत दहा लाख रूपयांहून अधिक दंड वसूल केला, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.