अमरावती - सततची नापिकी, वडिलांच्या अंगावर सव्व्वा लाखांचे कर्ज यामुळे इच्छा असूनही केवळ पैशा अभावी एम एसस्सीला प्रवेश घेता आला नाही. या परिस्थितीने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याच्या उच्चशिक्षित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई गावात समोर आली. मोहिनी अरूण टिंगणे (वय २४), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील अरुण विठ्ठल टिंगणे यांच्याकडे चार एकर ओलिताची शेती आहे. त्यात त्यांनी यावर्षी सोयाबीन, कपाशी व तुरीचे पीक लावले होते. या शेतीवर गावातील सेंट्रल बँकेचे 1 लाख 18 हजार रुपयांचे कर्ज आहे. यावर्षी पीक चांगले झाले तर हे कर्ज फेडून टाकू हा त्यांचा विचार होता. मात्र, यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडली. हाती लागलेले बोगस बियाणे, त्यानंतर आलेला जास्त पाऊस, सोयाबीन काढणीच्या वेळी आलेली खोडकीड त्यामुळे सोयाबिनचे पीक हातून गेले. नंतर कापसाला देखील बोंड अळीमुळे फटका बसला. त्यामुळे दोन एकरात त्यांना केवळ पाच क्विंटल कपाशीचे उत्पन्न झाले. त्यात लागवड आणि मशागतीचा खर्चही निघाला नाही.
पैसे नसल्याने शिक्षण घेता आले नाही -
अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते. त्यात कुटुंब चालवायचे कसे?हाही प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. बीएससी झालेली त्यांची मुलगी मोहिनी हिला पुढे शिकायचे होते. मोर्शी येथील आर आर लाहोटी महाविद्यालयातून तिने बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. परंतु, वडिलांकडे पैसे नसल्याने तिने एमएस्सीला प्रवेश घेतला नाही. मोहिनीच्या चांगल्या शिक्षणासाठी तिचे आईवडील विवंचनेत होते. आपल्या शिक्षणासाठी आई-वडिलांची होत असलेली घुसमट, मोहिनीला सहन झाली नाही, त्यामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेरपिंगळाई भागात शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास -
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा त्रास आहे. दरवर्षी या भागातील शेकडो एकर जमीन ही केवळ वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे पडीत राहते. काही वेळा आलेले पीक हे प्राणी उद्ध्वस्त करून टाकतात. दोन दिवसांपूर्वी अरुण टिंगणे या शेतकऱ्याच्या शेतात वन्यप्राण्यांनी हौदोस घातल्याने त्यांचे पीक उद्ध्वस्त केले.
शिक्षणासाठी कर्ज द्या नाहीतर....
शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल तर आत्महत्या करायची परवानगी द्या, अन्यथा नक्षली बनून येईल, असे खळबळजनक पत्र बुलडाण्यातील एका फार्मसीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी लिहिले. यामुळे आर्थिक परिस्थितीने हतबल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्चाबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहणारे बाबाराव मानखैर यांना दोन मूले आहे. मोठा प्रसाद व लहाना वैभव. प्रसाद शेतीत वडिलांना मदत करतो, तर वैभव हा बारावीनंतर धुळे जिल्ह्यातील बोराडी येथील फार्मसी कॉलेजात बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. बारावीनंतर जवळ असलेल्या पैशाच्या मदतीने वडिलांनी वैभवला फार्मसी शिक्षणासाठी टाकले. पहिल्या वर्षी वैभवला चांगले मार्क्सही मिळाले. वैभव पुढील वर्षात गेला. पण या वर्षी शेतात काही पिकलेच नाही, म्हणून जवळ पैसा नसल्याने दुसऱ्या वर्षाचे शिक्षण थांबविण्याची वेळ आली. वैभवने संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यापूर्वी मोठ्या अपेक्षेने अर्ज केला होता. मात्र, त्याला कर्ज मिळाले नाही.