अमरावती - भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात घरे, कार्यालये, आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.
हर घर तिरंगा’ उपक्रम, कोविड प्रतिबंधक लसीकरण व इतर विषयांबाबत त्या बोलत होत्या. जि. प. सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी उपस्थित होते.
ध्वजसंहितेचे पालन व्हावे - हर घर तिरंगा मोहिमेत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बांधव, विविध संस्था-संघटनांची मदत मिळविण्यात येत आहे. उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे. ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा. सूत, लोकर, पॉलिस्टर, सिल्कचा ध्वज लावता येईल. प्लास्टिकचा असू नये. त्याचा आकार तीन बाय दोन असावा. ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा, आदी नियमांचे पालन व्हावे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.