अमरावती - कोरोनाच्या संकट काळात रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचे असून एमआयडीसी असोसिएशनने पुढाकार घेऊन कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट सुरू करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. आज मदतीची भावना ठेवा आणि भविष्यात व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसी असोसिएशनला सुचविले आहे.
एमआयडीसी असोसिएशच्या वतीने कोविड लसीकरण
एमआयडीसी असोसिएशनच्यावतीने एमआयडीसीतील उद्योजकांसह कामगारांसाठी कोविड लसीकरण केले जात आहे. एमआयडीसी लगतच्या गोपाल नगर, दस्तुरनागर, साई नगर परिसरातील कामगार या लसीकरण मोहिमेचा लाभ घेऊ शकतात, असे एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
एमआयडीसी असोसिएशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी कामगारांची नोंदणी लसीकरण केंद्रावर न करता ते काम करीत असलेल्या कारखान्यात करावी, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. प्रशासनाकडून लसीकरण मोहिमेसाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.
ऑक्सिजन प्लांटसाठी जागा देण्याची मागणी
एमआयडीसी परिसरातील संजय अग्रवाल यांच्यासह काही उद्योजकांनी एकत्रित येऊन आम्हाला व्यावसायिकरित्या ऑक्सिजन प्लान्टसाठी जागा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही सर्व उद्योजक मिळून कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारा. आज लोकांचे प्राण वाचविण्याचा विचार करा. कोरोना गेल्यावर व्यावसायिकरित्या ऑक्सिजन प्लांट उभारण्यास प्रशासन मदत करणार, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले आहे.
हेही वाचा-भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण अन्य रुग्णांची तडफड पाहून 'त्याने' सोडले प्राण