अमरावती- संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून अमरावती-भुसावळ पॅसेंजर गाडीचा खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला. मात्र, ही गाडी आज दुसऱ्याच दिवशी रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. ऐनवेळी फलाटावर गाडी न आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
अमरावती रेल्वे स्थानकावरून भुसावळसाठी गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अमरावतीहून शनिवार, सोमवार आणि मंगळवारी सुरतसाठी फास्ट पॅसेंजर आहे. ही गाडी दररोज नसल्यामुळे निदान भुसावळपर्यंत अमरावती रेल्वे स्थानकावरून दररोज गाडी असावी, अशी प्रवाशांची मागणी होती.
हेही वाचा - फक्त देशाच्या हितासाठी! दडपण असतानाही सीएए, कलम ३७० सारख्या निर्णयांवर आम्ही ठाम
याची दखल घेत शनिवारी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती-भुसावळ या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ही गाडी सुरुवातीला शनिवार आणि रविवार धावणार असून येत्या काळात दररोज असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसार आज अकोला, शेगाव, मलकापूरला जाणारे अनेक प्रवासी अमरावती रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी सुटणार होती. मात्र, वेळ निघून गेल्यावरही गाडी फलाटावर न लागल्याने प्रवाशांनी याबाबत चौकशी केली. यावेळी गाडी साडेअकरा वाजताच रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बडनेरा रेल्वे स्थानकातून ही गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना चांगलीच धावपळ करावी लागली.