अमरावती - नेपाळची राजधानी काठमांडू येथे २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शांतता परिषदेत एकूण २६ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून परिषदेत अमरावतीचे ३० कलावंत संगीत, नृत्य आणि नाट्य सादरीकरणातून समानता, एकता आणि समृध्दीचा संदेश देणार आहेत.
अमरावतीच्या अद्वैत संस्थेच्यावतीने दिग्दर्शक विशाल तराळ यांच्या मार्गदर्शनात मागच्या महिनाभरापासून संगीत नाट्य कलाकृतीची तयारी सुरू आहे. या परिषदेत, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान, भूतान, श्रीलंका, नेपाळ आदी देशातील नाट्य कलावंतांचे संघ सहभागी होत आहेत.
अद्वैत अमरावती या संस्थेच्यावतीने जागतिक शांतीचा संदेश देणारे महर्षी गज अरविंद यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित संगीत, नृत्य, नाट्य कलाकृती प्रस्तुत करण्यात येनार आहे. या कलाकृतीची रंगीत तालीम टाऊन हॉल येथे घेण्यात आली.
या संगीत, नृत्य, नाट्य कलाकृतीमध्ये गजानन संगेकर, माणिक देशमुख, अभिजित देशमुख, भूषण उंबरकर, विलास पकडे, सौरभ काळपांडे, अनुप बहाड, योगेश जाधव, ऋषीकेश भागवतकर, अनुराग वानखडे, विष्णू आवंडे, सौरभ पातूर्डे, स्वाती तराळ, सौम्य सबनीस, अंजली टाले, यांच्यासह स्वेहा तराळ, पयोश्नी देशमुख हे बालकलावंतही सहभागी होणार आहेत.