अमरावती: माहितीप्रमाणे, राणा दाम्पत्याच्या सांगण्यावरून भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्यावर काही महिला कार्यकर्त्यांनी खोटी तक्रार दिली. त्या तक्रारीची पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला. १ मे पर्यंत गुन्हे मागे न घेतल्यास विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून २ मे रोजी जिल्हा कचेरीवर धिक्कार मोर्चा काढला जाईल. यामध्ये जिल्हाभरातून ३० ते ३५ हजार भीम अनुयायी सहभागी होणार असल्याचे बसपाचे शहराध्यक्ष सुदाम बोरकर पत्रपरिषदेत सांगितले.
काय होता घटनाक्रम? १४ एप्रिलला राणा दाम्पत्य डॉ. आंबेडकर चौकातील भीमजयंती कार्यक्रमस्थळी आले असता काही भीमसैनिकांनी 'कोण आले रे, कोण आले, भाजपचे दलाल आले', अशा घोषणा दिल्या. मुळात घोषणाबाजी करणाऱ्यांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल करायला हवे होते; मात्र राणा दाम्पत्याच्या सांगण्यावरून त्यांचा कार्यकर्ता विनोद गुहे हा तीन महिलांना गाडगेनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्या महिलांनी खोटी तक्रार देऊन भीमसैनिकांवर हेतूपुरस्सरपणे विनयभंगाचा खोटा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील १३ व १४ एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तक्रारीत नमूद घटना घडलीच नाही. खोटी तक्रार दाखल करणाऱ्या राणा दाम्पत्याच्या त्या महिला कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'जय संविधान' संघटनेचे समन्वयक किरण गुडघे यांनी यावेळी केली.
तर 'या' कारणामुळे गुन्हा दाखल? राणा दाम्पत्य 13 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आले असता त्यांच्या विरोधात आंबेडकरी समाजाची असलेली खदखद आणि रोष वानखडे यांनी दर्शविला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी राणांनी आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले, असल्याची माहिती भीम ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.
काय म्हणाले राजेश वानखडे? भीमसैनिकांनी १३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्य आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की किंवा आक्षेपार्ह हातवारे केलेले नव्हते. घटनेच्या दिवशी चौकात हजारो बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केले नसल्याचे भीमसैनिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी डॉ. आंबेडकर चौकातील सीसीटीव्ही फूटेज न तपासताच तसेच कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचे मत भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी नोंदविले.
हेही वाचा: Tiger Attack in Sitabani Zone : जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांनी वाघिणीला डिवचले, पहा पुढे काय झाले?