अमरावती - दोन व्यक्ती बँकेत ५० हजार रुपये भरायला जाताना, पाळत ठेऊन असलेल्या तीन हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन हल्ला करून पैसे लंपास केल्याची घटना घडली होती. हा प्रकार मालवीय चौकातील येस बँकेसमोर मंगळवारी घडला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून अठरा हजार रुपयांचा ऐवज व एक दुचाकी जप्त केली आहे.
अश्विन पाहाडन, प्रज्वल कालमेध, निखिल ओगले, विशाल यादव, अनिकेत कातोडे, अशी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अमरावतीच्या मालवीय चौकातील एस के टायर दुकानातील राजेंद्र भेरडे व अनिकेत कातोरे हे दुकानातील ५० हजार रुपये नागपूर नागरिक बँकेत भरायला जात होते. यावेळी तोंडाला रुमाल बांधून एक तासापासून पहारा ठेऊन असलेल्या तीन हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत त्यांची दुचाकी थांबवून राजेंद्र यांच्या पाठीवर धारधार शस्त्राने वार करत ५० हजार रुपये लंपास केले होते.