अमरावती - परतवाडा येथे रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरपी गावाला लागून असलेल्या जामून नाल्याला पूर आला. त्यामुळे, वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्याने आकोला ते परतवाडा महामार्ग दुपारपासून बंद झाला असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
परतवाडा शहरालगतच्या परिसरात तसेच मेळघाटच्या पायथ्याशी आज दुपारी दोनच्या दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने जामून नाल्याला मोठा पूर आला. नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाच्या बांधलेल्या पुलावरूनच वाहतूक सुरू होती. तो पूल पाईपसह वाहून गेल्याने या भागात प्रचंड पाणी तुंबले आहे. रस्त्याच्या मधात पाणी तुंबल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे.
हा महामार्ग अकोला येथून थेट मध्यप्रदेशातील बैतुलला जोडतो. मात्र महामार्ग बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक जड वाहने रस्त्यातच उभी झाली आहेत.
परतवाडासह संपूर्ण मेळघाट आणि अमरावती शहरात आज दुपारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. अकोला परतवाडा मार्ग सुरू कारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची पथक आणि पोलीस प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.