अमरावती : राज्यातील पाऊस लांबल्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अमरावती परिसरात पाऊस नाही, कोकणात देखील पाऊस नाही. धरणातील पाणीसाठा संपत चालला आहे. शेतीला पाणी मिळू शकत नाही. प्यायला देखील अनेक भागात पाणी नाही, टँकरची मागणी वाढत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. राज्यात सध्या या अशा अतिशय महत्त्वाच्या समस्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे डोळेझाक करून जाहिराती करून पोरखेळ केला जातो आहे, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
लक्ष विचलित करण्याचा उद्योग : आता मधल्या काळात अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती छापून आल्यात. या जाहिरातींमध्ये कुठेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचे छायाचित्र नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो नव्हता. या सर्व गोंधळानंतर पुन्हा एकदा नव्याने वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात आल्या. कारण नसताना कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. आता त्यांच्यातच ताळमेळ नसल्यामुळे हा सर्व प्रकार होत असताना मुद्दाम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वाद सुरू आहेत, असे स्टेटमेंट देऊन भाजपचे नेते जनतेचे लक्ष विचलित करण्याचा उद्योग करीत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी एकजूट ठेवण्याचा प्रयत्न : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही मित्रपक्षांमध्ये सर्वाधिक आमदार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे, विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला घोषित केले. तसेच वरच्या सभागृहात शिवसेनेला घोषित केले. आता या तिन्ही पक्षांमध्ये काही छोटे-मोठे मतभेद असतील तर तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हे मतभेद दूर करतील. उद्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे. एकंदरीत महाविकास आघाडी एकजूट व्हावी एकत्रित राहावी यासाठी तिन्ही पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करीत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -