अमरावती - चार वर्षापासून एका युवकाची एका युवतीशी घनिष्ठ मैत्री होती. मात्र, सहा महिन्यांपासून युवक युवतीच्या मैत्रीला प्रतिसाद देत नसल्यामुळे राग अनावर झालेल्या एका युवतीने युवकांच्या गुप्तांगावर दगड मारल्याची घटना अर्जुन नगर परिसरात घडली आहे. युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवतीवर गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी झालेल्या युवकाची शहरातीलच एका युवतीशी चार वर्षांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. मात्र, सहा महिन्यापासून हा युवक युवतीच्या मैत्रीला प्रतिसाद देत नसल्याने तरुणी संतप्त झाली होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही युवती अमरावतीच्या अर्जुन नगर परिसरात आली. यावेळी हा युवक तिला दिला दिसला. त्यावेळी युवतीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो युवक बोलण्यास टाळाटाळ करत होता.
या वेळी युवतीने त्याला आवाज दिला, असता तो थांबत नसल्याचे या युवतीच्या लक्षात आले. यानंतर युवतीने त्याचा पाठलाग करत त्याला थांबवले यावेळेस दोघात बाचाबाचीही झाली. दरम्यान संतप्त झालेल्या युवतीने हातात दगड घेऊन युवकाच्या गुप्तांगावरच मारला. त्यामुळे जखमी झालेल्या युवकावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी युवतीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.