अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठात अजब प्रकार समोर आला आहे. हेमा शर्मा या विद्यार्थिनीने एमबीएच्या पहिल्या दोन सत्राच्या परीक्षा दिल्यावर विद्यापीठाने तिला, तुझा प्रवेश रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले. 10 महिन्यानंतर प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत हेमाचे वडील शरद शर्मा यांनी, विद्यापीठाने योग्य न्याय दिला नाही, तर आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - पिकअपची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जळून मृत्यू
असे आहे प्रकरण
2019-20 या शैक्षणिक सत्रात हेमा शर्मा हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठात एमबीएला प्रवेश घेतला. प्रवेश समितीकडे गुणपत्रिकेची सत्यप्रत वगळता सर्व कागदपत्रे तिने सादर केली होती. गुणपत्रिका अनुशेष विषयांमुळे विद्यापीठाकडून उशिरा मिळणार, असे हेमाने प्रवेश समितीला सांगितले. प्रवेश समितीने गुण पत्रिका मिळताच आमच्याकडे सादर करावी, असे सांगितले. दरम्यान 4 डिसेंबर 2019 ला हेमाच्या अनुशेष विषयांचा निकाल लागल्यावर तिने गुणपत्रिका प्रवेश समितीकडे सादर केली. आता प्रवेश निश्चित झाला, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर हेमाने एमबीएच्या पहिल्या दोन्ही सत्राची परीक्षा दिली आणि दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.
एमबीए भाग दोनसाठी प्रवेश घेऊन ओनलाइन वर्गांना हेमा उपस्थित होती. असे असताना 28 ऑक्टोबर 2020 रोजी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी तुझा प्रवेश रद्द करण्यात आला असल्याचे पत्र विद्यापीठाने हेमाच्या घरी पाठवले. या पत्रामुळे हेमासह तिच्या पालकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
ही आहे मागणी
प्रवेश समितीने कागदपत्र आधीच तपासले असते तर असा प्रकार घडला नसता. प्रवेश समितीवर कारवाई करून समिती सदस्यांची पगारवाढ रोखण्यात यावी. विभाग प्रमुख दीड वर्ष डोळे झाकून प्रवेशासाठी आलेल्या अर्जावर स्वाक्षरी करीत होते. त्यांच्यावरही कारवाई करावी. एमबीएसाठी मी पात्र नव्हते, तर विद्यापीठाने प्रवेश शुल्क आणि परीक्षा शुल्क कसे काय वसूल केले? याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा - पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकी पेटल्याने दोघांचा होरपळून मृत्यू