अमरावती - काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्ण संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात तीन हजारपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने त्याची दखल घेतल्याचे पहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी मनपा प्रशासनानेही सहभाग घेतला आहे. सोमवारी विनामास्क फिरणाऱ्या तब्बल 42 बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.
जमावबंदीचे आदेश -
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता नियम कडक केलेले आहे सार्वजनिक कार्यक्रमात केवळ पन्नास लोकांची उपस्थिती ठेवणे आता अनिवार्य आहे. तसेच शहरात जमावबंदीचे आदेशसुद्धा लागू करण्यात आले आहेत. तरीसुद्धा अनेक लोक जे नियम मोडतात, त्यांच्यावर आता प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - मास्क न वापरणे पालघर जिल्हा परिषद अध्यक्षाला पडले महागात
प्रशासनाच्यावतीने 10 ठिकाणी पोलिसांचे पथकही तनात करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज (मंगळवारी) एकूण 484 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 228 वर पोहोचली आहे.