अमरावती - जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आदी मेळघाटातील आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ग्रामीण रुग्णालय उघडकीस आली आहे. यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहेत. मेळघाटात या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सीमा शंकर बेलसरे (20 रा. क्रॅकमोर अप्पर प्लेटो चिखलदरा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात 20 फेब्रुवारी रोजी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 17 महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, सीमा बेलसरे या महिलेच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला. पोटाचे टाके पिकल्याने तिला त्रास जाणवू लागला. त्यादरम्यान आठ दिवसाने प्रकृती खालावल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दोन मार्चपासून तिच्यावर उपचार सुरू होते.
शनिवारी सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला. संबंधित डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पती शंकर बेलसरे यांनी केली आहे.