अमरावती - दर्यापूरकडून अंजनगाव सुर्जी येथे जात असताना कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात ( Accident on Daryapur Anjangaon Road ) कारमधील १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर मृत तरुणीचे आई-वडील व अन्य दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता ईटकी फाट्याजवळ घडली. अर्पिता राजेश गिरी (वय-१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातात राजेश त्र्यंबक गिरी (वय-४७), रेखा राजेश गिरी (वय-४०, दोघेही रा. अंजनगाव) हे दाम्पत्य आणि विशाल गजानन सोळके (वय-२८), प्रतिक्षा विशाल सोळके (वय-२३, दोन्ही रा. घोंडसगाव अंजनगाव सुर्जी) असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार -
अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय कार क्रमांक एमएच११ बीके २७५८ ने अकोल्यावरुन दर्यापूर मार्गेगावी अंजनगावला जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचे टायर फुटले. यामुळे समोर जात असलेल्या दुचाकीला धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कारने धडक दिली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिताचा घटनास्थळीच मुत्यू झाला. तिचे आई वडील आणि दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर काही जणांनी मृत व जखमींना उपजिल्हा रुगणालयात आणले. तर चारही जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा - Yashomati Thakur : लोकांनी गाव का सोडले याची चौकशी करण्याचे आदेश : पालकमंत्री यशोमती ठाकूर