अमरावती- भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जागेवर आज दुर्दैवाने गुंड प्रवृत्तीचा आणि तडीपार असणारा व्यक्ती बसला आहे. जर न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाची प्रामाणीकपणे चौकशी झाली, तर अमित शाह निश्चितपणे कारागृहात जातील, असे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी म्हणाले. आज ते अमरावतीमध्ये बोलत होते.
हेही वाचा- आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट
नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात 13 जानेवारीपासून 23 जानेवारी पर्यंत इरविन चौक येथे मुस्लीम बांधवांच्यावतीने सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले आमदार अबू आझमी आज अमरावतीत आले. त्यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी अबू आझमी म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 ला या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संविधानानुसार समान अधिकार देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही जिन्ना ऐवजी महात्मा गांधींना महत्त्व दिले. आमच्यात भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तीने लिहिले आहे. या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. असे असताना पाच साडेपाच वर्ष सत्ता भोगणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात हवा शिरली आहे. ज्या लोकांनी इंग्रजांची माफी मागून गांधीजींच्या स्वातंत्र्य आंदोलनाला मदत करणार नाही, असे वचन इंग्रजांना दिले, अशा मानसिकतेचे सरकार सध्या देशात आहे. यांच्या शरीरात इंग्रजांचे रक्त आहे की काय? असा सवाल आमदार अबू आझमी यांनी केला.
सध्या देशात जे काही सुरू आहे ते केवळ मुस्लीम विरोधात नसून या देशातील खालच्या जातीतील लोक, इतर मागास वर्गीय गरीब आणि विद्यार्थ्यांविरुद्ध कट रचला जातो आहे. काहीही झाले तरी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात आम्ही असहकार आंदोलन छेडू, असे आमदार अबू आझमी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार अबू आझमी यांनी भरभरून स्तुती केली. उद्धव ठाकरे यांनी जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांड अशी केली. हा हल्ला मुंबईवर झालेल्या 26/ 11 प्रमाणे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. महाराष्ट्रात एकाही व्यक्तीला नागरिकत्व संशोधन कायद्याची झळ पोहोचू देणार नाही, अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे खरोखर मोठे नेते असून महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण देशभर मोदींविरोधात भूमिका घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी मंत्रिपदाची तमा न बाळगता एकत्र यायला हवे, असा सल्लाही आमदार अबू आझमी यांनी दिला.