अमरावती- जिल्ह्यातील तिवसा येथे पोलीस ठाण्यासमोर आज(बुधवारी) दुपारी महिलांनी आपल्या बैलजोड्यांसह आगळावेगळा बैलपोळा साजरा केला. अशा प्रकारचा महिलांचा पोळा काँग्रेस प्रदेशाध्यक्षा व तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भरवला. यात महिलांनी आपल्या बैलजोड्या आणून बैलांच्या शिंगावर व बैलांच्या अंगावर सरकार विरोधी मजकूर लिहिला होता. महिलांनी बैलांना सजवून आणले होते.
बैलांच्या अंगावर 'वाढली आहे बेरोजगारी', 'शेती गेली तोट्यात', 'सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा चला करू नाश' अशा घोषणा देत महिलांनी या पोळ्यात सरकारचा निषेध केला. शेतकरी कर्जमाफी, भाजप सरकार नौकरीदार, धनगर आरक्षण विरोधी सरकार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या, शेतकरी विरोधी भाजप सरकार अशी घोषवाक्ये महिलांकडून बैलांच्या शिंगावर व पाठीवर लिहण्यात आली होती.