अमरावती - मित्रांसोबत खेळताना 4 वर्षांचा चिमुकला विहिरीत पडल्याची घटना शेगाव नाका रोडवर घडली. परिसरात आरडाओरड सुरू होताच चिमुकल्याच्या वडिलांनी थेट विहिरीत उडी मारली आणि आपल्या बाळाला छातीशी कवटाळून पाण्याबाहेर काढले. मात्र, अतिशय अरुंद विहिरीतून त्यांना बाहेर येण्यास अडचणी येत होत्या. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे दोघांचेही प्राण वाचले.
अशी आहे घटना -
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या लगत असणाऱ्या शेगाव नाका रोडवरील साइतीर्थ अपार्टमेंटच्या विहीरीजवळ दोन लहान मूले खेळत होते. अचानक मनस्व मनीष मानकर (वय 4) हा विहिरीत पडला. आरडाओरडा झाल्यानंतर लगेचच त्याचे वडील मनीष मानकर (वय 38) यांनी विहिरीत उडी मारली. मात्र, विहिर खूपच अरुंद असल्याने दोघेही कसेबसे काठ धरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांचे शेजारी शुभम मोरे यांनी अग्निशामक विभागाला फोन केला. वाहन चालक पप्पू निभोरकर यांनी 3 मिनिटात घटनास्थळी जवानांना पोहचवले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ शिडी व दोरी टाकून दोघांनाही 15 मिनिटात बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. सर्वांनी अग्निशामक रेस्क्यू टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त केले.
'यांची' भूमिका देवदूताची -
अग्निशामक अधीक्षक अजय पंढरे यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक पप्पू, फायरमन अभिषेक निभोरकर, हर्षद दहातोंडे, अमोल साळुंके, सूरज लोणारे, कंत्राटी फायरमन जयकुमार वानखडे, शुभम जाधव यांनी देवदूतरूपात अथक परिश्रम घेऊन वडील आणि मुलाचे प्राण वाचवले.