अमरावती - जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या ही १४ हजारांच्या पार गेली आहे. दररोज १५०पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये मात्र एका ७५ वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तब्बल २२ दिवस अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट कोविड रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बऱ्या होऊन त्या घरी परतल्या.
हेही वाचा - 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नोव्हेंबरमध्ये सुरुवात
या ७५ वर्षीय आजीबाई या एक महिन्यापूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील ढाकुलगाव येथे नातेवाईकाकडे गेल्या होत्या. तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना १३ सप्टेंबरला अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर २९ तारखेला त्यांना सुटी देण्यात आली. परंतु, पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या आजीबाईंनी ५ ऑक्टोबरला कोरोनावर पूर्णपणे मात केली. या आजींना हृदयरोगही आहे. अशा परिस्थितीत त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांनी तिवसा येथे जंगी स्वागत केले. कुटुंबीयांच्या या प्रेमाने आणि स्वागताने या आजी भावूक झाल्या होत्या. डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने आणि रुग्णालयात चांगली व्यवस्था झाल्याने नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - सीबीआय छापा मारुन गेलं; अन् मग खासदारांनी कोरोना झाल्याचं सांगितलं