अमरावती - कायम कुपोषण, बेरोजगारी, विकास आणि आरोग्याच्या समस्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या मेळघाटमधील धारणी तालुक्यात तब्बल 702 तरुणांनी रक्तदान केले आहे. मेळघाटमध्ये प्रथमच एवढ्यामोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले. औचित्य होते ते पोलीस वर्धापन सप्ताहाचे, सध्या राज्यात पोलीस वर्धापन सप्ताह सुरू आहे, त्याच पार्श्वभूमीवर मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी दिवसभर रांग लागल्याचे पाहायला मिळाले.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पुढाकारातून पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 702 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आदिवासी भागात इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महारक्तदान झाले. विशेष म्हणजे आदिवासी बांधवही यामध्ये मागे नव्हते. रक्तदानात त्यांचाही मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळाले. रक्तदान शिबिरामध्ये 500 नागरिक रक्तदान करतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात 702 नागरिकांनी रक्तदान केले.