अमरावती- जिल्ह्यात शनिवारी पुन्हा दोघे पाण्यात बुडाले असून एकाचा मृत्यू तर एक जण अद्यापही बेपत्ता आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात येणाऱ्या रामापूर येथील एका व्यक्तीचा, तर भातकुली तालुक्यातील धमोरी कसबा येथील एका युवकाचा समावेश आहे. नावेद उद्दीन हुसैन उद्दीन (18) असे धमोरी कसबा आणि शंकर दांडगे (55) असे रामापूर येथील व्यक्तीचे नाव आहे.
अचलपूर तालुक्यातील रामापूर येथे शंकर दांडगे हे शहानूर नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले असता त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. शंकर दांडगे हे पत्नी व दोन मुलांसह मुबंईत राहायचे. त्यांना चार मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. गावातील आपले शेत भावांच्या नावावर करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी गावात आले होते. दुपारी शेतालगत वाहणाऱ्या नदीत ते आंघोळीला गेले असताना दुर्दैवाने नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.
तर अन्य घटनेत, नावेद उद्दीन हुसेन उद्दीन हा युवक गावातील चार मित्रांसोबत तलावात उतरला. दरम्यान नावेदला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. आपला मित्र पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच नावेदच्या चारही मित्रांनी घरी पळ काढला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ तलावाकाठी जमले. खोलापूर पोलिस बचाव पथक तलाव परिसरात पोचले. बचाव पथकाने बराचवेळपर्यंत तलावात शोध घेतला परंतु अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.