अमरावती - अन्न व औषध प्रशासनाने कारवाईत जप्त केलेला सुमारे 15 ट्रक गुटखा नष्ट केला आहे. या गुटख्याची किंमत 3 कोटींच्या आसपास असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. सुकली कंपोस्ट डेपो, येथे हा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही गत 3 वर्षात अमरावती शहरातील विविध भागातून जप्त केला होता.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची निर्मिती आणि विक्री केली जाते. शहरातील प्रत्येक पान टपरीवर तसेच अनेक किराणा दुकानांमधून गुटखा सर्रास विकला जातो. गत 3 वर्षात अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केलेला गुटखा गोदामात भरून ठेवला होता.
त्यानंतर बुधवारी जवळपास 15 ट्रक गुटखा शहरापासून बाहेर असणाऱ्या सुकली येथुल कंपोस्ट डेपोत ट्रेशरमध्ये टाकून नष्ट करण्यात आला. शहरात आजही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असून अन्न व औषधी प्रशासनाला गुटखा विक्रीवर संपूर्ण नियंत्रण कधी मिळणार ? याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.