अमरावती - सातपुडा पर्वत रांगेत दऱ्या खोऱ्यात वसलेल्या एकूण 24 गावांमध्ये आज देश स्वतंत्र होऊन 74 वर्षांचा मोठा काळ लोटला असतानाही वीज पोहचू शकली नसल्याने अंधार आहे. एकीकडे डिजिटल मेळघाटाच्या बाता केल्या जात असताना काळोखात जगणाऱ्या आदिवासी गावांची दुःखद कहाणी प्रत्यक्ष भवई या 24 पैकी एका गावात भेट देऊन जाणून घेन्याचा प्रयत्न केला. खरतर विजेअभावी या गावातील अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या नव्या पिढीचेही भविष्य काळोखातच गुडूप होणार की काय, असे वास्तव समोर आले आहे.
हेही वाचा - पुजा चव्हाणला न्याय न मिळाल्यास बंजारा समाजाचा आंदोलनाचा इशारा
खासदार नवनीत राणा यांनी वेधले लक्ष
जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मेळघाटातील 24 गावांमध्ये आजपर्यंत वीज पोहचली नसल्याबाबात खंत व्यक्त केल्याने मेळघाटातील हे काळे वास्तव ऐरणीवर आले. केंद्र शासनाने या गावांना वीज जोडणी करण्यासाठी विशेष योजना मंजूर करावी, अशी मागणी केल्याने या वीज नसलेल्या गावांमध्ये नेमके जनजीवन कसे असणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाटायला लागली. त्यामुळे, 24 पैकी एक असणाऱ्या भवई गावाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अतिशय साध्या भोळ्या लोकांवर अन्याय होत आल्याचे दिसून आले.
वीज नसल्याने अनेक समस्या
आमच्या गावात वीज नाही, ही साधी समस्या नाही. विजेअभावी घरात टीव्ही नाही, विजेअभावी गावात दळणासाठी चक्की नाही, वीज नसल्याने गावात पाणी नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या अंधारात कोणते जनावर कुठून येईल आणि काय होईल, अशा अनेक समस्या अगदी जिवावर बेतणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे भवई येथील ग्रामपंचायत सदस्य नामली सीताराम कासदेकर यांनी सांगितले.
2007 मध्ये गावात डिझेलवर चालणारी चक्की किशोर जमुनकर यांनी सुरू केली. मात्र, हा प्रयोग हवा तसा यशस्वी झाला नाही. आजही गावातील ग्रामस्थांना पहाड चालून आणि 16 कि.मी अंतरावर असणाऱ्या सेमाडोह या गावातून दळण आणावे लागते, असे किशोर जमुनकर म्हणाले.
सौरऊर्जा नावापूर्तीच
भवई गावालगत पहाडावर वसलेल्या माखला गावात 2010 मध्ये महाऊर्जा अर्थात, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या माध्यमातून सौर उर्जेद्वारे पहिल्यांदा प्रकाश पडला. आता गंभीर बाब म्हणजे, माखला येथून पहाड उतरून भवई गावचे अंतर 5 कि.मी आहे, तर व्हॅनद्वारे 20 कि.मी आहे. 2010 मध्ये माखला येथे सौर ऊर्जेद्वारे घरात दिवे लावले गेले, मात्र भवई गावात हा प्रकल्प पोहचायला तब्बल 11 वर्ष लागले. आता अवघ्या दोन-चार महिन्यांपूर्वी 350 लोकवस्ती असणाऱ्या भवई गावात प्रत्येक घरी सौर उर्जेद्वारे पी.व्ही. पॅनल, 12.8 व्हॅटची बॅटरी, एमपीपीटी सोलर चार्ज कंट्रोलर, 7 व्हॅटचे 5 एलईडी दिवे, 20 व्हॅटचा एक पंखा आणि एक चार्जिंग सॉकेट उपलब्ध करून दिले आहेत. वास्तवात जो पंखा या योजनेत मिळाला त्याची हवा धड एकाही व्यक्तीला लागू शकत नाही, अशी अवस्था आहे. आणि एलईडी दिव्यांमध्ये केवळ समाधान म्हणून प्रकाश पडतो. या दिव्यांमध्ये विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येणेही शक्य नाही. प्रत्येक घरामागे 50 हजार रुपये खर्च महाऊर्जाने केला असला तरी हा सर्वा खटाटोप नावपुरताच असल्याचे स्पष्ट होते.
आम्हाला वीज हवी
सौर ऊर्जेचे टप्पर आमच्या घरासमोर लावण्यात आले असले तरी ते कामाचे नाही. पावसाळ्यात हे सर्व निकामी होणार आहेत. यावर घरात टीव्ही सुरू होत नाही, याची बॅटरी अनेकदा बंद पडते, या सोलर ऊर्जेचा फारसा उपयोग आम्हला झालेला नसून आम्हाला आमच्या गावात सेमाडोह आणि इतर गावात आहे तशी वीज हवी, अशी मागणी भवई गावातील आदिवासी बांधव करीत आहेत. भवई येथील रहिवाशांप्रमाणेच वीज नसलेल्या सर्व 24 गावातील आदिवासी बांधवांना वीज हवी आहे, हे नक्की.
'या' गावात पोहचली नाही वीज
मेळघाटात धारणी आणि चिखलदरा तालुका मिळून एकूण 341 आदिवासी गाव आहेत. यापैकी धारणी तालुक्यातील चौपन, खामदा, किनी खेडा, रंगूबेली, कुंड, ढाकणा, पिपल्या, कोकमार, टेम्ब्रू, रक्षा, तसेच चिखलदरा तालुक्यातील सुनिता, भवई, खुशीदा, सावऱ्याखेड्या, मारिटा, बिच्चू खेडा, नवलगाव, मारी झरप, चुनखडी, रायपूर, खरीमल, बोरीट्याखेडा, रेट्याखेडा, माखला या गावात सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे काहीसा प्रकाश पडला असला तरी ही सर्व 24 गावे वास्तवात अंधारातच आहेत.
पुनर्वसन प्रक्रियेमुळेही अडथळा -
मेळघाटातील अनेक गावांचे स्वेच्छेने पुनर्वसन व्हावे, यासाठी शासन अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. आज ज्या गावांमध्ये वीज पोचली नाही, त्यापैकी 10 ते 15 गावे पुनर्वसन प्रक्रियेत मोडत असल्याने या अतिशय दुर्गम भागात वीज पोचली नसल्याचे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. अनेक गाव पुनर्वसनासाठी तयार आहेत. तर काही भागात अडचणी येत आहेत. या भागाचा वन्यजीवांच्या दृष्टीने विकास होणे आवश्यक असल्याचे यादव तरटे म्हणाले.
हेही वाचा - अमरावती : मंत्री यशोमती ठाकुरांच्या मोझरी गावात विरोधीपक्षाचा सरपंच