अमरावती - लॉनवर स्वयंचलित छत बांधण्यासाठी दोन भामट्यांनी अमरावतीच्या प्राध्यापकांकडून ९ लाख रुपये उकळून पोबारा केला आहे. वर्ष उलटूनही काम झाले नसल्याने गंडा घालणाऱ्या दोघांविरुद्ध प्राध्यापकाने येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सागर शशिकांत शिंदे (वय ३८ वर्षे) आणि निखिल पंडित (वय ४१ वर्षे, दोघे, रा. चिखली, पुणे) असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. अमरावतीच्या डेंटल कॉलेज परिसरात प्रा. तुषार गिरमकर यांच्या मालकीचे लॉन आहे. या लॉनवर स्वयंचलित छत बांधण्यासाठी चिखली येथील मे. टेक्नोसिस्टिम डोअर ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ऑगस्ट २०१८ मध्ये कंत्राट देण्यात आला होता. त्यासाठी सागर शिंदे आणि निखिल पंडित यांनी कोटेशन सादर केले होते. कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यावर ८ दिवसांच्या आत स्वयंचलित छत लॉनवर बांधून देण्याचे आश्वासन शिंदे आणि पंडित या दोघांनी प्रा. तुषार गिरमकर यांना दिले होत.
हेही वाचा - भारतातील पहिला स्काय वॉक प्रकल्प अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये
या कामासाठी प्रा. तुषार गिरमकर यांनी सागर शिंदे आणि निखिल पंडित यांना ८ ऑगस्ट २०१८ रोजी ४ लाख ३० हजार रुपये, १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दीड लाख रुपये, २२ ऑक्टोबरला अडीच लाख रुपये आणि २१ ऑक्टोबरला ७५ हजार रुपये असे एकूण ९ लाख ५ हजार रुपये दिले होते. परंतु, म्हणण्यानुसार त्यांनी ८ दिवसात काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे आता एक वर्ष उलटून गेले असतानाही केवळ ५ टक्के काम पूर्ण करून सागर शिंदे आणि निखिल पंडित यांनी पळ काढला आहे. या दोघांनी आता काम करण्यास टाळाटाळ केली असताना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रा. तुषार गिरमकर यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी सागर शिंदे आणि निखिल पंडित यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे.