अमरावती - केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अमरावतीमधील १६० पाकिस्तानी निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वांनी भारतीय नागरिकत्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे अर्जही केले आहेत.
देशाची फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील काही नागरिक भारतात आले. त्यानंतर ते भारताच्या विविध शहरांमध्ये स्थायिक झाले. अनेकांनी भारतात व्यवसाय थाटला. काहींना २० ते २५ वर्षांपूर्वी नागरिकत्व मिळाले, तर अद्यापही काहीजण दीर्घ कालावधीचा व्हिसा घेऊन वास्तव्य करीत आहेत. अशा निर्वासितांची संख्या १६० आहे. त्यापैकी १५९ जण अमरावती शहरात राहतात, तर १ जण धामणगाव रेल्वे तालुक्यात राहत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.
हे वाचलं का? - नागरिकत्व सुधारणा कायदा : नागपुरात १० हजार निर्वासितांना होणार लाभ, नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा
काही दाम्पत्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. मात्र, त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी अद्यापही प्रतिक्षा करावी लागत आहे. काही मुलांना भारतीय नागरिकत्व मिळाले असून त्यांच्या आई-वडिलांसाठी भारतीय नागरिकत्व मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात वास्तव्याला असणाऱ्या 160 पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाकडे अर्ज केला आहे. या सर्व 160 जणांची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून प्राप्त करून तसा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविला आहे. गेल्या ३-४ वर्षात शहरात दरवर्षी ४ ते ५ पाकिस्तानी निर्वासितांना केंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व दिले आहे. आता उरलेल्या 160 जणांना केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे लवकरच भारतीय नागरिकत्व मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तानमधून अमरावतीमध्ये २० वर्षांपूर्वी आलेल्या शांतीदेवी गगलानी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे स्वागत केले. यामुळे आमच्या अनेक नातेवाईकांना आता भारतीय नागरिकत्व मिळेल, या अपेक्षेसह त्यांनी आनंद व्यक्त केला.