अमरावती - जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अमरावतीत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 40 वर पोहोचली आहे.
अमरावतीत बुधवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 होता. मात्र, गुरुवारी सकाळी 11 वाजता अमरावतीत 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच काही वेळातच आणखी तिघांचा अहवाल प्राप्त झाला. तर, दिवसभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 12 ने वाढ होताच नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
गुरुवारी अमरावतीच्या खोलपुरी गेट परिसरातील 27, 70 आणि 35 वर्षीय 3 महिला तसेच 45 वर्ष आणि 39 वर्ष वयाचे 2 पुरुष कोरानाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर, हनुमान नगर परिसरातील 65 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाली. यासह, नालाबापुरा परिसरात 29 वर्षीय पुरुष, 29 आणि 30 वर्ष वयाच्या 2 महिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तर, कंवरनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका पानटपरी चालकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबातील तिघेजण कोरोनाग्रस्त असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 40 रुग्ण असून हा आकडा आणखी वाढण्याची भिती आहे. तसेच, हैदरपुरा, बडनेरा जुनी वस्ती, मासानगंज हे प्रतिबंधित क्षेत्र असून गुरुवारी कंवरनगर भागालाही प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.