अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट म्हणजे आदिवासीबहुल परिसर आणि हा परिसर कुपोषण व गरोदर महिला व बाल मृत्यूने चर्चेत असतो. या भागात इलाज करण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेपेक्षा बुवाबाजीवर अधिक विश्वास असताना कोरोनासंबंधी एक चांगली बाब येथून समोर आली आहे. चिंचखेडा या गावतील 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आदिवासी भागात कोरोनमुक्तीची ही वाटचाल अतिशय चकित करणारी आणि महत्वाची बाब आहे.
हेही वाचा - अमरावतीत लसीकरणासाठी पहाटे चारपासून नागरिकांच्या रांगा
कोरोना येताच केली गावबंदी
चिंचखेडा गाव हे सातपुड्याच्या पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावात आदिवासी आणि इतर जातीची लोक राहतात. गावाची लोकसंख्या 605 आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव होत असताना गावातील नागरिक, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी गावाच्या सीमा बंद केल्या. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना शाळेत विलगीकरणात ठेवले.
भीती दूर व्हायला लागली
आधी या गावात भीती इतकी होती की, चाचणी करायलासुद्धा कोणी तयार नव्हते. डॉक्टरांनी लोकांना याबाबत समय सूचकता ठेवत समजावण्याचा प्रयत्न केला, पण चाचणीला कोणी पुढे येत नसे. यातूनच गावातील पोलीस पाटील बबलू अजमेरिया यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुढाकार घेत स्वतःच चाचणी केली आणि लोकांना एक विश्वास दिला. त्यामुळे, लोकं समोर आलेत आणि चाचणी करू लागलेत. यात पाच ते सहा लोकं पॉझिटिव्ह आले. डॉक्टरांच्या मदतीने लोकांमध्ये असलेली भीती दूर व्हायला लागली.
...आणि ग्रामस्थ चाचणीसाठी पुढे आले
अमरावतीच्या किंवा परतवाड्याच्या कोरोना सेंटरमध्ये मनुष्य जातो आणि तिकडे आपली राखच वापस येते, या भीतीला दूर करण्यासाठी डॉक्टरांनी विश्वास दिला की, आपण गावातच गोळ्या, इंजेक्शन देऊन कोरोनाचा उपचार करू शकतो. तुम्ही स्वतः घरातच विलगीकरण होऊ शकता आणि तसेच झाले व गावकऱ्यांना विश्वास बसला आणि गावकरी चाचणीला पुढे येऊ लागले.
आरोग्य यंत्रणेने निर्माण केला विश्वास
आजही चिंचखेडा गावात चार ते पाच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांचा उपचार गावातच घरी सुरू आहे. टेंभूर सोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चंदन पिंपळकर यांच्या सांगण्यानुसार मेळघाटात आमची आरोग्य यंत्रणा दिसली तर गावकरी रानात पळून जायचे, पण त्यांना आरोग्य यंत्रणेवर आम्ही विश्वास ठेवायला लावला आणि संपूर्ण तपासणी, त्यांची काळजी केली व यात आम्हाला यश आले. या भागातील नागरिकांचे आरोग्य यंत्रणेपेक्षा त्यांच्या येथील बुवाबाजीवर जास्त विश्वास आहे. मात्र, आम्ही रात्रंदिवस गावकऱ्यांच्या संपर्कात राहिलो, त्यांचा आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास त्यांना बरे केल्यानंतर दृढ झाला. हळूहळू एक एक करून गावकरी आमच्यावर विश्वास ठेवायला लागले आणि आज असा चमत्कार झाला की या गावचे चौरेचाळीस वर्ष वयावरील सर्व व्यक्तींचे व्हॅक्सिनेशन आम्ही पूर्ण केले आहे.
युवकांची यादी तयार
अठरा वर्षांवरील युवकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या व्हॅक्सिनेशन साठीची नावासकट यादी तयार करून प्रशासन आणि सरकार ज्यावेळेस हे व्हॅक्सिनेशन सुरू करेल त्या दिवशीपासून गावाचे व्हॅक्सिनेशन पूर्ण केले जाईल असे डॉ. चंदन पिंपळकर यांनी सांगितले.
गावातील परिचरिकांचा महत्वाचा वाटा
या गावामध्ये आणि मेळघाटातल्या परिसरामध्ये आजही कुपोषण, गरोदर महिलांवर उपचार करण्यासाठी दोन परिचारिका आहेत. त्यांनी आपले हे काम सांभाळून या गावामध्ये आणि परिसरातील इतर गावांमध्ये कोरोनाला घेऊन आपली जनजागृती सुरू ठेवली. त्याचबरोबर, गरोदर महिलेला रोजचा उपचार व लहान मुलांचे व्हॅक्सिनेशन चालू ठेवत कोरोनाच्या या आव्हानाला पेलण्याचे काम करून या गावातील संपूर्ण शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले.
राज्यासमोर आदर्श
परिचारिकांच्या समवेत काम करणारे डॉक्टर गौरव चौधरी यांनी सुद्धा खूप मोलाची आणि महत्वाची भूमिका राबवत हे कार्य करून आज राज्यासमोरच नाही, तर देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची
पोलीस पाटील बबलू अजमेरिया यांनी चिंचखेडा गावासाठी दिवस रात्र झटून व्हॅक्सिनेशन पूर्ण केले. अजमेर सांगतात की, चाचणी पासून ते व्हॅक्सिनेशन पर्यंत मी व माझा परिवार सर्वात पहिले पुढे सरसावलो. गावामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये मी विश्वास निर्माण केला आणि मला साथ लाभली या भागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची. गावकऱ्यांच्या व माझ्या विश्वासाला अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी कधी तडा जाऊ दिला नाही. त्यामुळेच, मी गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करू शकलो आणि आज माझे गाव कोरोनाच्या मुक्ततेकडे वाटचाल करू लागले आहे.
लसीकरणासाठी युवकही सज्ज
गावकऱ्यांनी कोरोनाशी लढाई जिंकण्यासाठी आपले लसीकरण पूर्ण केले असून, नपुंसकत्व निर्माण होणे, माणसे मरणे ही भीती आमची दूर झाली आहे. असे काही होत नाही, ही अफवा होती, आता आम्ही बाकी सर्व मेळघाटातील सर्व नागरिकांना चाचणी करणे आणि लसीकरण करणे यासाठी प्रवृत्त करू. आता कोणाची भीती नाही, कसला आजार होत नाही, हे आता आम्हाला समजला आहे, युवक आपल्या मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लसीकरणासाठी सज्ज आहेत, असे आता ग्रामस्थ सांगतात.
हेही वाचा - अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली, लॉकडाऊन ठरला फायदेशीर