अमरावती - मेळघाटात मजुरांना येणाऱ्या चार चाकी वाहनाला अपघात झाल्याने वाहनात स्वार एक मजूर जागीच ठार झाला आहे. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. चिखलदरा तालुक्यातील टेंभूरसोंडा ( terrible accident of cruiser car Tembhursonda ) येथे हा अपघात घडला आहे. कुलंगना या गावातील शेतीकाम करण्यासाठी मजुरांना घेऊन क्रूजर गाडी शुक्रवारी सकाळी चोरमले येथील शेत शिवारात कामासाठी निघाली. टेंभूरसोंडा येथे कन्या आश्रम शाळेजवळच्या वळणावर क्रुझर चालक ईश्वर भांडेकर याचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात रहिवासी सुरेश हिरालाल जामुनकर याचा जागीच मृत्यू झाला.
जखमींच्या मदतीसाठी धावून आले ग्रामस्थ : अपघाताची माहिती मिळताच टेंभुरसोंडा येथील ग्रामस्थ अपघात स्थळी धावून आले. अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी क्रुझरच्या बाहेर काढले. अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात प्रीती बेलसरे, पद्मा बेलसरे, बाबूलाल बेलसरे, अनिल बेलसरे, अंजू काजलेकर, शंकर कासदेकर, संजय बेलसरे, सुमधी साहूरकर, लक्ष्मी कासदेकर, ललिता कासदेकर आणि बेबी राजकुमार कासदेकर हे गंभीर जखमी आहेत.
हेही वाचा - औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद पोहोचला उच्च न्यायालयात, 1 ऑगस्टला होणार सुनावणी