अकोला - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचा पदग्रहण समारंभ शनिवारी जिल्हा परिषद परिसरात आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्री राठोड या बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशात आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करीत जिल्हा परिषद समारंभात वेगळाच रंग भरला. त्यामुळे हा सोहळा आकर्षक ठरला.
हेही वाचा - अकोला जि. प. पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात; अंजली आंबेडकर यांची विशेष उपस्थिती
जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व स्थापन केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी महिलांना प्राधान्य देत उपाध्यक्षपदी बंजारा समाजाच्या सावित्रीबाई राठोड यांना विराजमान करण्यात आले आहे. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाजाला स्थान दिले आहे. उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड या पदग्रहण समारंभासाठी पारंपरिक वेशात आल्या होत्या. यावेळी त्यांनी समाजातील इतर महिलांना घेऊन पारंपरिक बंजारा नृत्य सादर करीत गीतही म्हटले. यावेळी डफड्याच्या तालावर त्यांनी ठेका धरला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हा क्षण पाहण्यासाठी गर्दी केली होती.