अकोला - राज्य आणि जिल्हास्तरीय प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी तसेच समस्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे आज (शनिवारी) धरणे आंदोलन करण्यात आले. येथील जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन करण्यात आले. तर या मागण्या तातडीने सोडविण्यासाठी राज्यभरात प्राथमिक शिक्षकांकडून धरणे देण्यात येत आहे.
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शिक्षकांना वेतन अनुदान देण्याची प्रतिविद्यार्थी अनुदान देणे या विषयाबाबत स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गट रद्द करण्यात यावा, निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणीचे सर्व प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत, प्रस्तावासाठी कार्यालयातील उपलब्ध गोपनीय अहवाल जोडावेत, राज्यभरात निवड श्रेणीसाठी एकच निकष लागू करावेत, शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हेही वाचा - बुलडाण्यात दोन तरुणांची हत्या; तीन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळांना आर्थिक मदत करावी आणि आयोगाच्या निधीतून विद्युत बिले भरण्याची तरतूद करावी, तसेच शैक्षणिक कामासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या केलेल्या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इंधन व भाजीपाला संबंधी प्रलंबित बिले तत्काळ अदा करावी, मूळ सेवापुस्तिका पडताळणीसाठी तालुकास्तरावर शिबिरे घेण्यात यावेत, दिव्यांग संवर्गाची जेष्ठता सूची प्रसिद्ध करावी याही मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात अनेक शिक्षक सहभागी झाले होते.