अकोला - महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केल्याशिवाय विकास होऊ शकत नाही, यासाठी राज्यातील सर्व महिला बचत गटांना टप्प्या-टप्प्याने प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या नीता ठाकरे यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रज्वला योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयामार्फत महिला बचत गटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरिता आयोगामार्फत कार्यशाळा घेण्याचे निर्देश आयोगाचे आहेत. राज्य महिला आयोगाच्या वतीने अकोला जिल्ह्यात अकोट, मूर्तिजापूर व अकोला या तीन ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना समूहाच्या माध्यमातून कार्य करीत मिळणारे फायदे व विविध उद्योगधंद्यांना उभारी देण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याचा मानस राज्य महिला आयोगाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांना कौशल्यपूर्व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जोपर्यंत ती समूहाने काम करणार नाही तोवर त्यांची प्रगती होणार नाही. त्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हा उद्देश ठेवून राज्य महिला आयोग राज्यभरात अशा प्रकारची कार्यशाळा राबवण्याचे कार्य करीत आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या वतीने कार्यशाळेचे प्रशिक्षण देण्यासाठी शलाका साळवी, उषा वाजपेयी, स्मिता परचुरे, दिपाली मोकाशी, मीनल मोहाडीकर ह्या राज्यभरात कार्यशाळा घेण्याचे कार्य करीत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी अनेक महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.