अकोला - गावात सुरू असलेला दारूचा व्यवसाय बंद करण्यात यावा. हा व्यवसाय करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथील महिलांनी व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात आज ठिय्या आंदोलन केले. या महिलांच्या मागणीस प्रशासन योग्य न्याय देईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घरात होताहेत वाद
बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव या गावातील अनेक कुटुंब गोरगरीब आहेत. मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवितात. अशा परिस्थितीत अनेक मजूर हे गावात सुरू असलेल्या अवैध दारूच्या दुकानात जाऊन दारूची खरेदी करून ती सेवन करतात. त्यामुळे ते व्यसनाला लागलेले असल्याने त्यांच्या रोजच्या कमाईचा पैसा हा वाईट मार्गात लागत असून त्यांचे आर्थिक व दारू प्यायल्याने शारीरिक शोषण होत असल्याचा प्रकार होत आहे. ते दारू पिऊन घरी आल्यावर घरातील सदस्यांसोबत भांडण करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील शांतता आणि प्रेमळ वातावरण कलुषित होत आहे. परिणामी, या प्रकारचा घरातील महिलांसोबतच लहान मुलांवर वाईट परिणाम होतो. यामुळे गावातील महिला, मुलीही सुरक्षित नाही आहेत.
कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश
गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शेलगावतील महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे न जाता थेट पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर तिथे असलेल्या पालकमंत्री यांच्या प्रतिनिधींनी महिलांचे निवेदन स्वीकारून पालकमंत्री यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.