अकोला - कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय व ज्या ठिकाणी गर्दी होते अशी स्थळे बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्या आदेशानुसार अकोला जिल्हाधिकाऱ्यांनीही महाविद्यालय, शाळा बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार या आदेशाचे आज (सोमवार) जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये काटेकोरपणे पालन करण्यात आल्याचे दिसत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शुकशुकाट होता. मात्र, शिक्षक आपल्या कर्तव्यावर हजर होते.
शाळा 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. १ एप्रिलपासून आदेश आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्वावलंबी विद्यालयाच्या सुपरवायझर सुनिता पांडे यांनी सांगितले आहे. अनेक शाळांच्या बाहेर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे फलक लावण्यात आले आहेत. काही पालक विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत आले होते. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत असल्यामुळे मुलांना घरी न्यावे लागले. तर बऱ्याच शाळेतील शिक्षकही हजेरी लावून घरी परत गेले.