अकोला - जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविण्यापेक्षा दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली, तर कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यास अधिक सोयीस्कर होईल, अशी सूचना भाजपच्या आमदारांनी केली. या संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांसोबतच नोकरदार वर्गाचेही नुकसान होत असल्याचे विदर्भ चेंबर ऑफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - सध्याच्या कोरोना विषाणूमध्ये संसर्ग वाढविण्याचे प्रमाण जास्त - आरोग्य उपसंचालक
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान संचारबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी संचारबंदीमध्ये आणखीन आठ दिवसांची वाढ करत ती आठ मार्च पर्यंत वाढविली. संचारबंदी वाढविल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कोरोनावर अंकुश लावण्यासाठी हा उपाय पुरेसा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उलट दुकाने कमी वेळेसाठी उघडून तिथे गर्दी होते. त्यामुळे, व्यापार पूर्णवेळ सुरू ठेवावेत, ज्यामुळे दुकानांवरील गर्दी कमी होईल, अशी सूचना व्यापारी वर्गाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
संचारबंदी लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेणे अपेक्षित असल्याचे मत भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले. आधी लावलेल्या संचारबंदीमध्ये कोरोना विषणूवर अंकुश लावण्यात किती टक्के यशस्वी झालो, याचा विचार करून त्यांनी पुढील संचारबंदी लावली असती तर ते योग्य झाले असते, असे मतही सावरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यापाऱ्यांसोबत भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, भाजप शहराध्यक्ष विजय अग्रवाल हे उपस्थित होते.
हेही वाचा - अकोला: संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची गर्दी