अकोला - काँग्रेस पक्षातील बंडखोरी करणाऱ्या किंवा पक्षाला त्रास देणाऱ्या उमेदवारांसाठी ईव्हीएम मशीनचा उपयोग केला. त्यानंतर भाजपने या मशीनचा उपयोग पाडण्यासाठी नव्हेतर जिंकण्यासाठी केला. एकंदरीतच राजकीय पक्ष ईव्हीएममध्ये फेरफार करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या 2004 मध्ये ईव्हीएम मशीन आल्या. ईव्हीएम मशीन आहे, तोपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू, असे गृहीत धरू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिला.
हे वाचलं का? - Citizenship Amendment Bill : मोदी सरकारची आज राज्यसभेत अग्निपरीक्षा, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुबड्या घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार नाही. त्यामुळे ही निवडणूक इतर कोणत्या पक्षाशी गट बंधन न करता स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर लढवावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुचविलेले पक्षाचे उमेदवार राहणार आहे. त्यांच्याबाबत नाराजी ठेवून पक्षाचे काम न करता दुसऱ्यांना मदत होणार नाही, याची खबरदारी देखील कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.