अकोला - वंचित बहुजन आघाडीचे आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाकर, अपक्ष संदीप पाटील, अपक्ष प्रा. संतोष हुशे यांनी बाळापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष टाकलेला उमेदवारी अर्ज आज परत घेतला. यामुळे या मतदार संघात आता तिघांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे या मतदार संघात तीन मराठा उमेदवारांंध्ये चांगलीच चुरस होणार आहे. विशेष म्हणजे, एमआयएमचे डॉ. रहमान खान हे नेमकी किती मते घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंची गर्जना, शिवसेनेचा 'मुख्यमंत्री' करणार म्हणजे करणारच!
बाळापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी बळापूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडीने प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांना उमेदवारी दिली आहे. तरीही आमदार सिरस्कार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटपर्यंत काहीही होवू शकते, अशी आशा त्यांना होती.
हेही वाचा- 'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
शिवसंग्राम पक्षाचे संदीप पाटील, भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाकर, वंचितचे संतोष हुशे यांनी अर्ज मागे घेतले. भाजप-सेना युतीत शिवसंग्रामला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे संदीप पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेचे नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम गावंडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. धैर्यवर्धन पुंडकर या तीन मराठा उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे. विद्यमान आमदार सिरस्कार यांनी मागे घेतलेल्या अर्जामुळे त्यांना मिळणारे मतदान आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. पुंडकर यांना मिळणार असल्याची शक्यता वर्तविन्यात येत आहे.