अकोला - भारत आणि चीन या दोन देशांमध्ये असलेली सध्याची परिस्थिती म्हणजे ही नुराकुस्तीसारखी आहे. या दोन्ही देशांच्या प्रमुखांना त्यांच्या जनतेला तोंड द्यायचे आहे. म्हणून ही परिस्थिती निर्माण करण्यात आली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, मी गेल्या काही दिवसांपूर्वी या परिस्थिती संदर्भात बोललो होतो. मी परत सांगत आहे की, भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील परिस्थिती ही नुरा कुस्ती सारखी आहे. म्हणजेच किंगकाँग वर्सेस दारासिंग अशी अवस्था सध्या आहे. भारताच्या पंतप्रधानांना येथील जनतेला तोंड द्यायचे आहे. त्यासोबतच चीनच्या प्रमुखांना ही त्यांच्या जनतेला तोंड द्यायचे आहे. त्यामुळे आता सध्याची परिस्थिती ही अशी आहे. बरेच जण माझ्यासारखी टीका करीत होते. त्याच्यामुळे कुठेतरी एखादे ठिकाणी फिजिकल वायलेंस वरून बुलेट व्हायलेंस वर येऊन गेलेली दिसते, असेही डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले.