अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कोविड वार्डात भरती असलेल्या रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाने कोविड वार्डात तोडफोड केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यावेळी महिला सुरक्षा रक्षकासोबत झालेल्या हातापायीदरम्यान महिला सुरक्षा रक्षक गंभीररित्या जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले.
उपचारात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. रुग्णालयातील कोविड वार्ड व कोविड आयसीयूमध्ये भरती एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे उपचारात वैद्यकीय अधिकारी यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईक युवकाने कोविड वार्डात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वार्डाबाहेर नियुक्त सुरक्षा रक्षकाने युवकाला आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्याचा महिला सुरक्षा रक्षकासोबत शाब्दीक वाद झाला. वाद अधिक विकोपाला गेल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुद्धा झाली. त्यामध्ये महिला सुरक्षा रक्षक गंभीररित्या जखमी झाली आहे. याप्रकरणाची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. सिटी कोतवाली पोलिसांकडुन याबाबत कारवाई केली आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारने राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवला; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार