अकोला - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळावा शासनाच्या नियमानुसार करण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय बौध्द महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनेही एक पाऊल मागे सरकत मिरवणूक रद्द करून व्हर्च्युअल सभा घेण्याचे आज जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
भारतीय बौध्द महासभेतर्फे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मोठी सभा घेण्यात येते. या सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करत असतात. नागपूर नंतर ही सभा दर्शनीय असते. या सभेला हजारो नागरिक येत असतात. या सभेसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटना यांचा ही सिहाचा वाटा या कार्यक्रमासाठी असतो. परंतु, कोरोना संकट असल्याने शासनाने दिलेल्या नियमानुसारच कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सेनेचा दसरा मेळावा हा मोठाच होईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर भारतीय बौद्ध सभा आणि वंचित बहुजन आघाडीनेही शिवसेनेसारखी मिरवणूक व सभा घेणारच अशी ताठर भूमिका घेतली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने महासभा व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना 149 ची नोटीस बजावली होती.
शेवटी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा एका सभागृहात घेऊन तो शंभर सैनिकांच्या उपस्थितीत घेण्याचे जाहीर केले. यानंतर आज भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडीने बैठक घेऊन आपली भूमिका नरम करत शिवसेना जर नियमांचे पालन करून मेळावा घेत आहे तर आम्ही ही मिरवणूक रद्द करत असून अॅड. प्रकाश आंबेडकर हे व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून संवाद साधणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी जाहीर केले.