अकोला - जिल्ह्यामध्ये आज(मंगळवार) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हिवरखेड येथे जोरदार पाऊस झाला. तर, पातूर तालुक्यातील काही गावांमध्ये गारा पडल्याची माहिती आहे. या अवकाळी पावसाने पिकं काढणीला आलेल्या गावाला फटका बसला आहे.
हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होता. अकोला शहरामध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडला. तर, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड या गावामध्ये चांगला पाऊस पडला आहे. या पावसामुळे वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाला असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे.
तसेच या अवकाळी पावसाचा काढणीला आलेला हरभरा गहू व कापसाला फटका बसला आहे. मूर्तिजापूर शहरामध्ये पाऊस पडला नसल्याचे समजते.