अकोला - बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे असलेल्या ईगल कंस्ट्रक्शन कंपनीत आज (गुरुवारी) वेल्डींगचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात ( Eagle Construction Company Fire ) दोन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. आतिक खान व संजय पवार अशी मृतकांची नावे आहेत. तर इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, यामध्ये तिघे जण गंभीर जखमी असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि बाळापूर पोलीस ( Balapur Police ) दाखल झाले आहेत. आतिक खान व संजय पवार अशी मृतकांची नावे आहेत.
अशी घडली घटना
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळ असलेल्या एका शेतामध्ये ईगल कंस्ट्रक्शन कंपनीचा हॉटमिक्स प्लांट रस्त्याच्या कामासाठी बनविण्यात आलेला आहे. या साहित्यामध्ये मोठ्या लोखंडी टाक्या, मिक्सर मशीन आणि केमिकल टाक्याही आहेत. याठिकाणी दहा पेक्षा जास्त कामगारही दररोज काम करत असतात. या कंपनीच्या आवारात केमिकलच्या टाकीजवळ वेल्डींगचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना एक चिंगारी टाकीवर उडाली. यामुळे याठिकाणी मोठा स्फोट झाला. या स्फोटात आतिक खान व संजय पवार हे दोन कर्मचारी जागीच भाजल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कर्मचारी या घटनेनंतर कंपनीच्या आवारात दिसत नसल्याची माहिती आहे. त्यांचाही या आगीत मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. तर तिघे गंभीर झाल्याची माहिती असल्याचेही समोर येत आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की त्यातून आगीचे लोट निघत होते. रिधोरा गावातील ग्रामस्थांनीही या आगीच्या ठिकाणी धाव घेतली. तर बाळापूर पोलीसही दाखल झाले. आग आटोक्यात आणल्यानंतर दोन कामगारांचा मृतदेह पूर्णपणे जळून खाक झालेला दिसून आला आहे. तर इतर बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्यासह तहसीलदार, डाबकी रोड पोलिस निरीक्षकांसह आदींनी भेटी दिल्या आहेत. अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. यातील गंभीर जखमींची नावे कळू शकली नाही. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली आहे.
हेही वाचा - Honey Trap Case : आमदार मंगेश कुडाळकरांना अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्याला राजस्थानमधून अटक