अकोला - रस्त्याच्या सपाटीपेक्षा खाली असल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरात शिरण्याची समस्या एका व्यक्तीला जाणवत होती. ही समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी या व्यक्तीने चक्क घरच वर उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा येथील एका कंत्राटदार कंपनीने तब्बल ३०० जॅक लावून हे दुमजली घर दोन फुट उचलले आहे. चार फुटापर्यंत हे घर उचलण्यात येणार आहे. अकोल्यात असे पहिल्यांदाच घडत असल्याने प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
प्रा. ययाती तायडे हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता पदावर कार्यरत आहे. अकोल्यातील शास्त्री नगरात त्यांचे दोन मजली घर आहे. घरासमोरील रस्त्याची आणि मागील बाजूच्या सर्विस लाइनची उंची वाढल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्यांना सांडपाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या निर्माण होत असली तरी त्यावर मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र होते. या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशातून शहरातील अभियंता अरविंद कांबळे यांनी इंटरनेटवर शोध घेतला असता त्यांना हरियाणा येथील श्री मार्कंडेश्वर नामक एजन्सी जॅकच्या माध्यमातून इमारत उचलत असल्याचे आढळून आले. कांबळे यांनी संबंधित एजन्सीसोबत संपर्क साधून त्यांना या घराचे कंत्राट दिले.
घर वर उचलण्याचे काम सध्या सुरू झाले असून 300 जॅक लावून सदर घर 4 फुटाने उचलण्यात आले आहे. जॅकच्या माध्यमातून घराची उंची वाढविण्याचा हा विदर्भातून शहरात पहिलाच प्रयोग असल्याचे मानले जात आहे. घराची उंची रस्त्यापासून तीन फूट वर करण्यात आली असून, आणखी एक ते दीड फूट उंच करण्याची शक्यता आहे. उत्सूकतेपोटी हा प्रयोग पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
हेही वाचा - जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत