अकोला - अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्द दोन खुनांच्या घटनांनी हादरले. सुकळी या गावात सख्ख्या चुलत भावाने अनैतिक संबंधाच्या कारणावरून भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. तर पत्नीशी भांडण करून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना अकोली जहागीर येथे घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे अकोट तालुक्यात आज एकच खळबळ उडाली आहे.
सुकळी या गावांमध्ये दीपक शेषराम हरामकार हा त्याचा चुलत भाऊ गोपाल गणराज हरामकार याच्यावर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून संशय घेत होता. या संशयाच्या कारणाने त्याने त्याचा सख्खा चुलत भाऊ गोपाल याच्यावर सोमवारी रात्री दिडच्या सुमारास चाकूने पोटात वार करून गोपाल यांचा खून केला. या घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी मारेकरी दीपक यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू ही जप्त केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सुकळी या गावात एकच खळबळ उडाली आहे.
सुकळी या गावातील सख्ख्या चुलत भावाचा खून केल्याच्या घटनेच्या तपासाला सुरुवात होत नाही तोच अकोली जहागीर येथे अशोक नारायण सोनवणे याने पत्नी निर्मला सोनवणे हिचा राहत्या घरीच गळा आवळून खून केल्याची घटना घडल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलीस ठाणेदार ज्ञानोबा फड यांना मिळाली. सुकळी येथील तपासाच्या संदर्भात तेथे असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड अकोली जहागीर येथे सकाळी पोचले. याठिकाणी घटनेचा पंचनामा करून त्यांनी निर्मला सोनवणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेतील निर्मला सोनवणे यांचा पती अशोक सोनवणे याचा तपास करण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांची दोन पथक हे बाहेरगावी पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली आहे. फरार आरोपी अशोक सोनवणे याला लवकरच अटक करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अशोक सोनवणे दोन महिन्यांपासून बाहेरगावी करत होता काम
निर्मला सोनवणे यांचा खून करून पसार झालेला तिचा पती अशोक सोनवणे हा सासरवाडीत राहत होता. दोन महिन्यांपासून तो बीड येथील वीटभट्टीवर काम करीत होता. दोन महिन्यानंतर तो घरी परत आला होता. रात्री त्याचे व त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. तोही त्याच्या पत्नीवर संशय घेत असल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फळ यांनी दिली आहे.