अकोला : जिल्ह्यातील पातूरजवळ ट्रक आणि रुग्णवाहिका यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना आज(मंगळवारी) दुपारी घडली. तर चारजण जखमी झाले आहेत. यामध्ये मृत व्यक्ती व जखमींची नावे कळू शकली नाही.
वाशीमवरुन रुग्ण घेऊन येणारी रुग्णवाहिका (क्र. एमएच 04 एच 539) अकोल्याकडे येत होती. दरम्यान, पातूर घाटात या रुग्णवाहिकेला समोरुन येणाऱ्या ट्रक (क्र. एचआर 69 बी 6633) ने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यातील जखमी व मृतकांची नावे कळू शकली नाही. याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.