अकोला - तिहेरी तलाक विधेयक संसदेत पारित झाल्यानंतर या कायद्याअंतर्गत अकोला जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती-पत्नीमध्ये समझोता करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतच पतीने पत्नीला सर्वांसमोर तीन वेळा 'तलाक' हा शब्द उच्चारून घटस्फोट दिला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ४ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याचे विवाह २०१३ मध्ये मंगरुळपीर येथे झाला होता. तक्रारदार पत्नी आणि पती यांना तीन अपत्ये आहेत. विवाहितेचा पती, सासू, सासरे, नणंद, किरकोळ कारणावरून तसेच दिसायला चांगली नाही म्हणून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत होते. पती सतत 'तू मला नको, मी दुसरे लग्न करतो, तू निघून जा' असे बोलून शिवीगाळ करत होता. या त्रासाला कंटाळून ती मुलासह माहेरी बाळापूर येथे राहायला आली. या दोन्ही कुटुंबातील दोन्ही समजदार आणि प्रतिष्ठित नागरिकांनी समझोता करण्यासाठी बाळापूरला बैठक घेतली.
बैठकीत त्यांच्यामध्ये भांडण झाले. पतीने भर बैठकीमध्ये पत्नीला 'तुझे तलाक दिया' असे तीन वेळेस बोलून तिला बेकायदेशीर घटस्फोट दिला. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी पतीसह सासरा मोहम्मद तस्लिम, सासू अलियु निसा, नणंद शाहीन परवीन तसेच नातेवाईक अब्दुल गणी अब्दुल अजीज यांच्या विरुद्ध कलम ४९८ (अ), ५०४, ३४, मुस्लीम महिला (विवाहवरील हक्काचे संरक्षण कायदा) २०१९ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक गजानन शेळके याचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नौशाद करत आहेत.